Shoonya Gadh Shahar | शून्य गढ शहर
Shoonya Gadh Shahar | शून्य गढ शहर
अनेक संग्रहांतून वाहत येणारी मंगेश नारायणराव काळेची अखंड आणि प्रदीर्घ कविता भाषिक समृद्धी सोबतच काव्यात्मकता जपत उद्ध्वस्त होत जाणाऱ्या वर्तनाची साक्षही पुरवते, व्यापक भारतीय, जागतिक कला, साहित्य, दर्शनांचे सखोल भान जपत सातत्याने समकालीन राहते. हताश करणाऱ्या समकाळावर भाष्य करते.
जागतिकीकरणामुळे अंतर्बाह्य बदललेलं शहर वरवर पाहता कितीही लोभस वाटत असलं तरी ते आतून शून्यवतच असतं. गोरखनाथ म्हणतात त्याप्रमाणे, मानवी अस्तित्वाचं एक मेटॅफिजिकल रूपक होऊन पुढे येतं,
आजच्या काळात कविता लिहिणं दिवसेंदिवस कठीण आणि जोखमीचं झालेलं असतांना या गूढ रूपकाचे अनेक कंगोरे आणि पदर उलगडणारी ही कविता आपल्याला चकित करते. या कवितेतला राजकीय संदर्भ ढोबळ होत नाही किंवा काव्याभाषेवर कुठेच वरचढही होत नाही. अनेक मिथके, रूपककथा, प्रतिमा, प्रतिकांचा संतत प्रवाह समोर येतो तो मंगेशच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून, तो वाचकाला स्तब्ध करून टाकणारा आहे. म्हणूनच शून्य गढ़ शहरमधील कवितेकडे आजच्या भीषण आणि ओंगळवाण्या वर्तमानाविषयीचं एक महत्त्वाचं काव्यात्मक विधान म्हणूनही पाहता येईल, जे अस्वस्थ करणार आहे. या शून्य गढ़ शहरमध्ये सतत जागत राहण्याच्या काळात ‘कौन सूता कौन जागे हैं?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र आपल्या सर्वांनाच दयावे लागणार आहे.
सचिन केतकर
मंगेश नारायणराव काळे नव्वदोत्तर काळातील महत्त्वाचे कवी आहेत. चांगल्या कवितेवर आणि कवीवरही रसिक समीक्षकाची नजर ठेवून असल्याने या कवीने आपल्या प्रत्येक संग्रहातून स्वतःला सिद्ध केलं आहे. आत्मपरतेपासून सुरू झालेला त्यांचा काव्यप्रवास समकाळातील राजकीय-वास्तवापर्यंत पोचला आहे. निघृण राजसत्ता वर्तमानावर राज्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे भय, अस्वस्थता, त्यातून निर्माण झालेलं नैराश्य दाटून येण्याच्या काळात भूतकाळातील अशाच घटितांचा हा कवी शोध घेत राहतो. बहिऱ्या मुक्यांच्या गर्दीत हरवलेल्या भाषेच्या उगमाशी जावून त्यातून उमटलेला विद्रोह आपल्या शब्दात भरतो.
कवितेलाच बटीक केलं जाण्याच्या आजच्या काळात अनेक कवी लेखणी म्यान करून कृतक कवितेत रमलेले असताना हा कवी मात्र आपला आवाज लावून धरतो आहे. आजच्या भयावह वर्तमानाचा अन्वयार्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. अख्खा देशच गुंगीत असण्याचा हा काळ आहे. मिडिया, लेखक, कवीनां दावणीला बांधले जात आहे. अशा काळात हा कवी वेगवेगळ्या आवाजांतून, दृश्यांतून, शब्दांतून, तर कधी चित्रलिपीतून हे सगळं दाखवू पहातो आहे. तो शोधू पहातोय स्वतःतील संवेदनशील माणूस आणि आपल्या आतड्यातून विद्रोहाचं, बंडाचं झाड उगवून येण्याच्या शक्यता. आजच्या प्रलयंकारी काळाला नेमकेपणानं भिडणारी, आपल्यातल्या संवेदनशील कवित्वाचं ऑडिट करणारी ही कविता आहे.
नीरजा
आज बहुतांश समकालीन कवी कवितेचा, भाषेचा, रूपाचा, आशयाचा पृष्ठस्तरीय विचार करत असताना मंगेशने या सगळ्यांपेक्षा भिन्न स्वरूपाची कविता सातत्याने लिहिली आहे. त्याच्या कवितेत मानवी आदिम प्रेरणांचा, स्त्री-पुरुषातील वैश्विक नात्याचा, तृष्णा, वासनेचा, निसर्ग आणि मानवातील द्वैताचा एक आगळा-वेगळा आदिबंध जसा पाहता येतो, तसाच भवतालाविषयीचा जागरूक हस्तक्षेपही.
कवितेच्या प्रकटीकरणासाठी त्याने घडवलेली भाषाशैली मराठी, उर्दू, फारसी, इंग्रजी अशा भाषेच्या संकरातून घडली आहे. प्रत्येक वेळी भाषेचा, आशयाचा, रूपाचा, त्यासाठी रचल्या गेलेल्या कथनांचा प्रयोगशील वापर हे त्याच्या कवितेचे वैशिष्ट्य सांगता येईल. त्याने रचलेला भाषेचा रंगविभोर कॅनव्हास वाचकाला थांबायला भाग पाडतो, एका अद्भूत अशा प्रदेशात घेऊन जातो. शून्य गढ़ शहरमधून त्याने गिरवलेलं नवीन वळण मराठी कवितेला समृद्ध करणारे आहे.
दिनकर मनवर
मंगेश नारायणराव काळेच्या कवितेची पार्श्वभूमी पाहता त्याने मराठी कवितेच्या परंपरेत त्याच्या प्रत्येक संग्रहातून समकालीन जाणीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. शून्य गढ़ शहरही याच प्रवासातले एक वेगळे वळण आहे. व्यवस्था प्रतिरोधाचा प्रायोगिक रंगमंच असेही या कवितेला संबोधता येईल. कारण या कवितेचे भाकित समकालीन व्यवहाराच्या उपयोजितेत दडले आहे किंवा असेही म्हणता येईल की, शून्य गढ़ शहर आजच्या दर्दनाक वास्तवाचे दत्तऐवजीकरण करणारा बंद लखोटा आहे. हे रूपक याचीही साक्ष देणारे आहे की, माणसाच्या असतेपणाची तृष्णा जोवर शाबूत आहे तोवर कविता आपली सोबत करतील आणि या कवितेच्या सोबत असतील जीते जागते भारतीय लोक.
दा.गो. काळे
मंगेश आजवरच्या सर्व कवितासंग्रहांशी भाषेचा धागा जुळता ठेवून, आताच्या काळाला शब्दांत, प्रतिमांत, दृश्यांत, आवाजांत आणि अखेरीस शून्यवत असण्यात शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे हा त्याचा प्रयत्न नाहीच आहे, तर तशी त्याने सांगितलेली गोष्टच आहे ही आताच्या काळाची. जी सांगता सांगता गोष्टीतल्या गोष्टीत तो आपल्याला फिरवून आणतो. म्हणजे त्याच्या घट्ट पिळदार भाषेतून, प्रतिमांतून एकच गोष्ट सांगण्याचे अनेक पदर तो उलगडत असतो, म्हणजेच भाषेच्या अतोनात शक्यता शोधत भाषेचा रियाज करत तो कवितेचाही रियाज कवितेतूनच करत असतो.
किशोर कदम ‘सौमित्र’
Cover Painting: Ghulam Mohammed Sheikh