Chitra-Reshha | चित्ररेषा
Chitra-Reshha | चित्ररेषा
कविता आणि चित्रकला या दोन्ही एकमेकांशी साहचर्य असणाऱ्या, एकमेकीशी अंतस्य जोडल्या गेलेल्या कला आहेत. यांचे सर्जन जेव्हा एकत्रित केले जाते तेव्हा वाचक, दर्शक, आस्वादक दोन चित्र अनुभव एकत्रित घेत असतो. चित्रातून कविता वाचणे नि कवितेतून चित्र पाहणे अशी ही अनगढ आस्वादाची गोष्ट आहे. विशेषत: जेव्हा एखादा सर्जक या अनवट पायवाटेवरून चालतो तेव्हा तो निश्चितच एक वेगळे कलारूप साकार करत असतो. इथे सर्जनाची असोशी जशी असते तशीच भाषेतून व्यक्त होण्याची चाहसुद्धा कार्यरत असते. शितल सोनवणे यांनी हे आवाहन आपल्या पहिल्याच सर्जनात नेटकेपणाने पेलले आहे.
हे तर स्पष्टये की इथे केवळ कवितेची अभिव्यक्ती केंद्र नाही. किंवा जी काही समकालीन कविता आज लिहिली जातेय त्या वाटेवरचा हा प्रवासही नाही. शितल यांच्याच शब्दात सांगायचे तर, असंख्य रंगाच्या छटा उधळत त्या गडद अवकाशात एकरूप होत जाण्याचा हा प्रवास आहे. मनाच्या तळाशी दाटून आलेल्या उमाळ्याची ही स्पंदन आहेत, जी चित्रातून, रेषेतून, शब्दातून अवतरित झाली आहेत. काही एक अर्थाने हे एक कोलाज आहे—भाषेचं, चित्राचं—ज्यातून चित्रकर्तीनं स्वतःच शब्द चित्र रूप घडवलं आहे. ते जितकं साक्षात्कारी आहे तितकंच ते सहज, सुलभही आहे. त्यामागे सर्जनाची असोशी जशी दिसते तशीच व्यक्त होण्यातील निरागसताही दिसून येते. चित्र नि कवितेचा हा बंध अतिशय सनातन नि आदिम असा आहे. एक प्रदीर्घ मोठी परंपरा या मागे उभी आहे, जी मराठीत तरी अभावानेच मुखर झाली आहे. अर्थात हे सुरुवातीचे वळण आहे. याच वळणावरून पुढे गेल्यावर चित्र नि कवितेतलं द्वैत सोडवता येणार आहे. त्याचाशी रूबरू होता येणार आहे ... या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
मंगेश नारायणराव काळे
~
शितल सोनवणे उगले
www.chitrareshha.com
शितल या स्वेच्छेने एक कलाकार तर व्यवसायाने वास्तुविषारद आहेत, किंबहुना त्यांनी आपल्या व्यावसायिक पदवीची आणि स्वेच्छेची योग्य सांगड घालून वास्तुविषारद व कला यांचा सुंदर संगम घडवला आहे.